आवाहन

Monday, September 26, 2016

ज्ञानेश्वरीतलं विज्ञान...
लेखक- नितीन कळंबे.

संत ज्ञानेश्वर माउली आणि सिनस्थिशिया (Synesthesia)

सर्वप्रथम आपण सिनस्थिशिया म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. आपणा सर्वांना अनस्थेशिया Anesthisia म्हणजे काय हे माहित असेल. अनस्थेशिया म्हणजे काहीही न जाणवणे (No Feelings). उदा. शस्त्रक्रियेवेळी भूल दिल्याने अंग बधीर होऊन वेदना जाणवत नाहीत. सिनस्थिशिया म्हणजे एकत्रितरित्या जाणवणे(Joint Feelings) उदा. तुम्ही जर इंद्रधनुष्य पाहीले तर ते सुख केवळ तुमच्या डोळ्यांना मिळेल मात्र सिनस्थिशिया असलेल्या एखाद्याला ते इंद्रधनुष्य सुद्धा दिसेल आणि त्याचसोबत त्याला त्या इंद्रधनुष्याची चव सुद्धा घेता येईल. आहे की नाही गम्मत !  आपल्याला हे कदाचित खोटे वाटू शकते मात्र पाश्चात्यांनी वारंवार प्रयोग करून हे सत्य असल्याचं सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला खरं मानणं भागच आहे. किंबहुना ‘जे जे पाश्चात्य ते ते उदात्त’ अशी आपली बौद्धिक वसाहतवादी वृत्ती आहेच. असो.

सिनस्थिशिया रोग आहे का ? तर नाही. आपण जग ज्याप्रकारे समजून घेतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे सिनस्थिशिया असणारे लोक समजून घेतात. आपण नाद ऐकतो तर सिनस्थिशिया असणारे नाद पाहतात, त्याची चव घेतात, इतकेच काय तर काहींना हा नाद रंगांमध्येही दिसतो. विसाव्या शतकात याविषयी जागृती सुरु झाली आणि मग सिनस्थिशिया असणारे लोक हळूहळू जगासमोर येऊ लागले. आतापर्यंत आपल्याला काही रोग आहे असे त्यांना वाटत होते मात्र त्यामागचे विज्ञान समजून घेतल्यानंतर त्यांना हायसे वाटले. मग या यादीत अभिनेत्री मार्लिन मन्रो पासून कादंबरीकार व्लादिमिर नाबोकोव्ह, संगीतकार फेरेल विल्यम्स, असे आपापल्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आपणांस सिनस्थिशिया असल्याचे उघडपणे सांगू लागले. मात्र हीच गोष्ट इ.स. १२९० साली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरी या गीतेवरील टीकेत नमूद केली असेल तर ? होय, हे खरे आहे ! माउली सहाव्या अध्यायातील पंधराव्या ओवीत म्हणतात,
“ जिये कोंवळीकेचेनि पाडें | दिसती नादींचे रंग थोडे |
वेधे परिमळाचे बीक मोडे | जयाचेनि ||६.०.१५||”
म्हणजे, शब्दाला नाद आहे,रंग, रूप, स्पर्श, गंध आहे. नुसता आहेच नाही तर माउलींनी प्रत्येक शब्द तसा घडवलाय ज्याने मानवी मनावर अनुकूल परिणाम व्हावेत. माउली म्हणतात, माझ्या या शब्दांना असा सुगंध आहे की त्यापुढे जगातलं सगळे सुगंध तुच्छ ठरतील. ते पुढे म्हणतात,
“ऐका रसाळपणाचिया लोभा | कीं श्रवणिची होती जिभा |
बोलें इंद्रियां लागे कळंभा | एकमेकां ||६.०.१६|| ”

म्हणजे, “माझ्या शब्दाला केवळ नाद नाही तर रस, रंग, सुगंधसुद्धा आहे. नाद आला की कान म्हणेल हा माझा विषय आहे, जीभ म्हणेल, नाही नाही, हा नाद अतिशय रसाळ आहे त्याचे सेवन मीच करणार, डोळे म्हणतील की या नादाला रूप आहे, रंग आहे त्यामुळे हा माझा विषय झाला अशाप्रकारे सर्व इंद्रियांमध्ये भांडणे लागतील ” असे माउली म्हणतात.

आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला होणाऱ्या संवेदना ग्रहण करणाऱ्यासाठी मेंदूमध्ये विशिष्ट केंद्रे वेगवेगळ्या भागांत असतात. सिनस्थिशिया असलेल्या लोकांमध्ये ही केंद्रे एकमेकांवर पुरेसा प्रभाव टाकतात त्यामुळे समजा कान आणि नाकाची केंद्रे एकत्र आली तर नाद कानाद्वारे ऐकला की त्याचा गंध यायला सुरुवात होते. कान आणि जिभेची केंद्रे एकत्र आली तर त्या नादाची चव आपल्याला कळू शकते. आता याचा अध्यात्माशी काही संबंध आहे का ? तर नाही.  सिनस्थिशिया असणाऱ्यांचे ग्रहणतंतू असे आच्छादित (Overlap) झाले आहेत याला विज्ञानाची यथायोग्य कारणमीमांसा आहे. आता यातील महत्वाचा भाग म्हणजे, हे आच्छादन प्रत्येक वेळी अनुकूल असेल असे नाही, उदा. एक गायिका आहेत त्यांनी सा,रे,ग,म म्हटलं की त्यांना प्रत्येक सुराचा विशिष्ट असा रंग दिसतो, त्यावरून त्या आपला सुर बरोबर लागतोय की नाही नाही याचा अंदाज बांधतात त्यामुळे हा सिनस्थिशिया त्यांना त्यांच्या व्यवसायात फायदेशीर आहे. डेनियल टेन्मेट हा असाच अवलिया माणूस. त्याला आकडे हे वेगवेगळ्या आकारात आणि रंगात दिसतात यामुळे त्याची स्मरणशक्ती असामान्य झाली आहे. गणितातल्या Pi च्या दशांशचिन्हाच्या पुढील  तब्बल २२,५१४ इतक्या किंमती त्याने लक्षात ठेवल्या आणि याची  ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद सुद्धा झाली आहे. मात्र काही लोकांना सिनस्थिशिया तितकासा अनुकूल असत नाही. काही व्यक्तींची नावे नुसती ऐकली तरी त्यांना तिरस्कार उत्पन्न होतो, काही अक्षरे त्यांना कडू लागतात, काही रंग त्यांना कर्कश असा आवाज ऐकवतात, त्यामुळे अशा व्यक्ती सिनस्थिशियामुळे त्रस्त झालेल्या दिसतात. माउलींच वेगळेपण इथेच आहे असे मला वाटते. ही सिनस्थिशियाची संकल्पना माउलींनी त्यांना हवी तशी अनुकूल करून वापरली आहे. गीतेला ‘देशीकार लेणे’ चढवून माउलींनी मराठीत नवीन शब्द घडवले आहेत हे कदाचित त्या शब्दांचा अध्यात्माला अनुकूल असा प्रभाव श्रोत्यांच्या मनावर पडावा म्हणून आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे श्रीभगवंतांच्या विविध नामाची पुष्पे भीष्मांनी व्यवस्थित रचून मोक्षफल देणारा विष्णुसहस्रनामरुपी गुच्छ तयार केला आहे त्याचप्रमाणे माउलींनी; श्रोत्यांच्या अंत:करणात भक्तिरसाचा ओलावा निर्माण व्हावा यासाठी ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर अक्षरश: ब्रह्मानंदातून बुडवून काढून एक एक ओवी त्याप्रमाणे घडवली आहे आणि त्यासाठी त्यांनी मराठी भाषेत पर्यायाने नवीन शब्द सुद्धा निर्माण केले आहेत.

(अपूर्ण...)





Tuesday, April 14, 2015


समर्थ रामदासांची करूणाष्टके

१] अनुदिन अनुतापे तापलो

अनुदिन अनुतापे तापलो रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धावरे धाव आता ॥१॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावे कास तूझी धरावी ॥२॥
विषयजनित सूखे सौख्य होणार नाही । तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही ।
रविकुळटिळका रे हीत माझे करावें । दुरित दुरि हरावे स्वस्वरुपी भरावे ॥३॥
तनुमनुधनु माझे राघवा रुप तुझे । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे ।
प्रचळित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळभजनलीला लागली आस तुझी ॥४॥
चपळपण मनाचें मोडिता मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणउनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥५॥
जळत हृदय माझे जन्म कोट्यानकोटी । मजवरी करूणेचा राघवा पूर लोटी ।
तळमळ निववी रे राम कारूण्यसिंधु । षड्‍रिपुकुळ माझे तोडि याचा विरोधु ॥६॥
तुजविण करुणा रे कोण जाणेल माझी । सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी ।
झडकरी झड घाली धांव पंचानना रे । तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥७॥
सबळ जनक माझा राम लावण्यपॆटी । म्हणउनि मज पोटी लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेऊनि कंठी । अवचट मज भेटी होत घालीन मिठी ॥८॥
जननिजनकमाया लेकरुं काय जाणे । पय न लगत मूखे हाणतां वत्स नेणे ।
जळधरकणआशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविण मज तैसे जाहले देवराया । विलग विषमकाळी तूटली सर्व माया ।
सकळजनसखा तू स्वामि आणीक नाही । वमकवमन जैसे त्यागिलें सर्व काही ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे ।
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि देती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मग कैचें चालते हेंचि साचे ।
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ॥१२॥
सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । परम कठीण देही देहबुध्दी वळेना ॥१३॥
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी । सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी ।
घडिघडि मन आतां रामरुपी भरावे । रविकुळटिळका रे आपुलेसें करावे ॥१४॥
जलचर जळवासी नेणती त्या जळासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गुणरासी ।
भूमिधरनिगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेटि हे रामदासी ॥१५॥


२]  तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो

असंख्यात रे भक्त होऊनि गेले । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनांसी ।
स्थिती ऐकतां थोर विस्मित जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥२॥
सदा प्रेमरासी तयां भेटलासी । तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यराशी ।
अहंतामनी शब्दज्ञाने बुडालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥३॥
तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।
बहू धारणा थोर चक्कीत जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥४॥
बहूसाल देवालये हाटकाची । रसाळा कळा लाघवे नाटकाची ।
पुजा देखतां जाड जीवी गळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥५॥
कितेकी देहे त्यागिले तूजलागी । पुढे जाहले संगतीचे विभागी ।
देहे दुःख होतांचि वेगी पळालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥६॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।
पस्तावलो कावलो तप्त जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥७॥
सदासर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी ।
बहू स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥८॥

३] रघुनायका मागणे हेंचि आता

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अति आदरे सर्व सेवा करावी ।
सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघुनायका मागणे हेंचि आतां ॥१॥
तुझे रुपडे लोचनि म्यां पहावे । तुझे गुण गाता मनासी रहावे ।
उठो आवडी भक्तिपंथेचि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥२॥
मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवे पुरवावी ।
वसावे मज अंतरी नाम घेतां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥३॥
सदासर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
नुपेक्षी कदा गुणवंता अनंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥४॥
नको द्रव्य दारा नको येर झारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।
सगुणी मज लावी रे भक्तिपंथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥५॥
भवें व्यापलो प्रीतीछाया करावी । कृपासागरे सर्वचिंता हरावी ।
मज संकटी सोडवावे समर्था । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥६॥
मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ।
नको संशयो तोडिं संसारव्यथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥७॥
समर्थापुढे काय मागो कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता ।  रघुनायका मागणें हेंचि आतां ॥८॥
ब्रिदाकार्णे दीन हातीं धरावे । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।
सुटो ब्रीद आम्हांसी सांडूनि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥९॥

४] बुद्धि दे रघुनायका

युक्ति नाही बुद्धि नाही । विद्या नाही विवेकिता । नेणता भक्त मी तुझा । बुद्धि दे रघुनायका ॥१॥
मन हे आवरेना की  । वासना वावडे सदा । कल्पना धावते सैरा । बुद्धि दे रघुनायका ॥२॥
अन्न नाही वस्त्र नाही । सौख्य नाही जनांमध्ये । आश्रयो पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥३॥
बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना । बहू मी पीडलो लोकीं । बुद्धि दे रघुनायका ॥४॥
तुझा मी टोणपा जालो । कष्टलों बहुतांपरी । सौख्य ते पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥५॥
नेटकें लिहीतां येना । वाचितां चुकतो सदा । अर्थ तो सांगता येना । बुद्धि दे रघुनायका ॥६॥
प्रसंग वेळ तर्केना । सुचेना दीर्घ सूचना । मैत्रिकी राखितां येना । बुद्धि दे रघुनायका ॥७॥
कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू । प्रत्यही पोट सोडीना । बुद्धि दे रघुनायका ॥८॥
संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं । परमार्थू कळेना की । बुद्धि दे रघुनायका ॥९॥
देईना पुरविना कोणी । उगेचि जन हांसती । विसरु पडेना पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१०॥
पिशुने वाटती सर्वे । कोणीही मजला नसे । समर्था तू दयासिंधू । बुद्धि दे रघुनायका ॥११॥
उदास वाटते जीवी । आता जावे कुणीकडे । तू भक्तवत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ॥१२॥
काया वाचा मनोभावे । तुझा मी म्हणवीतसे । हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ॥१३॥
सोडविल्या देव कोटी । भूभार फेडिला बळे । भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ॥१४॥
भक्त उदंड तुम्हाला । आम्हाला कोण पूसते । ब्रीद हे राखणे आधी । बुद्धि दे रघुनायका ॥१५॥
आशा हे लागली  मोठी । दयाळू बा दया करी । आणखी नलगे काही । बुद्धि दे रघुनायका ॥१६॥
उदंड ऐकिली कीर्ति । पतितपावना प्रभो । मी एक रंक दुर्बुद्धी । बुद्धि दे रघुनायका ॥१७॥
रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला । संशयो लागतो पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१८॥

५] श्रीरामावर भार

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही । नसे प्रेम हे राम विश्राम नाही ।
असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनी घेतला भार माझा ॥१॥
रघुनायका जन्मजन्मांतरीचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा ।
जनी बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लेश नाही तयाचा ॥२॥
दिनाचे उणे दीसतां लाज कोणा । जगीं दास दीसे तुझा दैन्यवाणा ।
शिरी स्वामि तू राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाही सदा शीघ्र कोपी ॥३॥
रघूनायका दीन हाती धरावे । अहंभाव छेदोनिया उद्धरावे ।
अगूणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी उतरावे ॥४॥
किती भार घालू रघुनायकाला । मजकारणे  शीण होतील त्याला ।
दिनानाथ हा संकटी धाव घाली । तयाचेनि हे सर्व काया निवाली ॥५॥
मला कोंवसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे  फीटली सर्व चिंता  ।
समर्था काय उत्तीर्ण व्हावे । सदासर्वदा नाम वाचे वदावे ॥६॥

Sunday, April 5, 2015

शरण शरण हनुमंता ...--नितीन कळंबे

शरण शरण हनुमंता ...



हनुमंत हे काय रसायन आहे हे अतिशय मार्मिक शब्दांत संत तुकाराम महाराज सांगतात,ते म्हणतात “ऐसा प्रतापी गहन | सकळ भक्तांचे भूषण ||”.हनुमंत हे सर्व जगतामध्ये प्रतापी तर आहेतचं परंतु यापेक्षाही त्यांच्या ठिकाणी असलेल्या रामभक्तीमुळे त्यांचे आस्तित्व सर्व भक्तांत विशेषत्वाने उठून दिसते.तुम्हा-आम्हाला हनुमंत हे केवळ बालपणी सूर्याचा ग्रास करण्याला उड्डाण करणारे, समुद्र उल्लंघून जाणारे,लंकादहन करणारे,द्रोणागिरी पर्वत एका हातात उचलून आणणारे,पाताळातून प्रभू राम आणि लक्ष्मण यांना सोडवून आणणारे,राक्षसांशी लढणारे अशा अर्थी परिचित असतील,याहीपुढे एकनिष्ठ रामभक्त,आजन्म ब्रह्मचारी म्हणूनही त्यांची माहिती आपल्याला असेल परंतु भक्तीच्या प्रांतात महायोगी श्रीहनुमंतरायांचे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असलेले स्थान हे केवळ संतांनी जाणून त्यांना त्रिवार नमन केले आहे,केवळ म्हणूनच प्रभूरामांचे अनन्यभक्त म्हणून ख्याती पावलेल्या हनुमंतरायांना भक्तामाजी अग्रणी असलेले तुकोबाराय हनुमंतांनी त्यांना भक्तीचा मार्ग दाखवावा म्हणून विनंती करतात.

दास हनुमंत आणि वीराग्रणी हनुमंत -  स्वत: हनुमंतांचे अवतार असलेल्या समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतरायांची जी मंदिरे उभारली त्यामध्ये काही मंदिरांत "
“भीमरूपी महारुद्र,वज्रहनुमान मारुती”
असे सामर्थ्य असणारे,वीर्यवान,पराक्रमी,चिरंजीवी,वीर हनुमंत राक्षसांचे निर्दालन करण्याच्या अविर्भावात आहेत तर काही मंदिरात हृदयामध्ये निरंतर नामस्मरण करणारे बलभीम मारुती प्रभूरामासन्मुख हात जोडून दास्यभावाने नम्रपणे उभे आहेत.हनुमंतरायांच्या अपरिमित पराक्रमाच्या कथा तर सर्वांना माहीतच आहेत.रामायण,महाभारत,पुराणे आदि ग्रंथांत आपण बलवान आणि बलाढ्य अशा दैत्यांच्या विविध कथा वाचतो.दैत्यांच्या ठिकाणी सुद्धा शक्ती असते,अमाप बळ असते परंतु या बळाला उन्मादाची,क्रौर्याची,अहंकाराची जोड असते त्यामुळे ते अपरिमित बळ भगवत्कृपेला प्राप्त होत नाही,याउलट हनुमंतराय हे अपरिमित बळ असूनसुद्धा स्वत:ला भगवंतांचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतात त्यामुळेच त्यांच्यावर भगवंतांची निरंतर कृपा राहून ते भक्तीमार्गात सुद्धा श्रेष्ठत्वाला पावलेले वीर झाले.संत साहित्याचे प्रगाढ अभ्यासक प.पू.शिरीष दादा कवडे म्हणतात,अहंकार हा परमार्थमार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे.भगवंतांचे परिपूर्ण प्रेम साधावयाचे असेल तर साधकाचा अहंकार प्रथम समूळ जायला हवा.आणि तो तसा जाण्यासाठी त्याने स्वत:ला कमी दर्जाचे,तुच्छ,क्षुद्र मानले पाहिजे.जे नुसतीच ग्रंथांची पोपटपंची करतात त्यांची अशी समजूत असते की,”दास्यभक्ती मुळे साधक दुबळा आणि पराधीन होतो!””शिवाय;कोणाचीही गुलामगिरी का व कशासाठी करायची ?” असाही किंतु त्याच्या मनात असतो.त्याच्या या समजुतीचा अर्थ परमार्थात: एवढाच असतो की,”त्यांनी खरे तत्वज्ञान समजूनच घेतले नाही”.
    
“दास्य” या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपण हनुमंतरायांच्या दास्यभक्तीला लावू नये तर परमार्थमार्गात  दास्य म्हणजे आपला अहंकार उत्तरोत्तर कमी करीत जाणे,असा आहे.या दास्यभावाचे प्रभूरामांवरील  प्रेम किती अलौकिक असावे यासंबंधी एक कथा सांगतात.एके दिवशी भरत आणि शत्रुघ्न विचार करतात,”हनुमंतराय देवांपुढे सतत उभे असतात,देवांची प्रत्येक कामे करायला सदैव तत्पर राहतात यावरही कडी म्हणून की काय देवांनी स्वमुखाने काही सांगण्याआधीच त्यांची इच्छा जाणून ती ते पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतात,त्यामुळे आम्हाला देवांची सेवा करावयाची संधीच मिळत नाही”,असा विचार करून एक दिवस हनुमंतराय स्नानादी कर्मांसाठी शरयू नदीवर गेले असता ही संधी साधून भरतशत्रुघ्न बंधुद्वयींनी देवांच्या सेवेला कोणत्या गोष्टी लागतील,कोणती सेवा कोणत्या वेळेत व्हायला हवी अशी यादी तयार केली आणि ती यादी रामरायांपुढे सादर करून त्यांची अनुमती मिळवली.इकडे हनुमंतराय स्नान आटोपून प्रभूंना पूजेसाठी फुले आणावयास जाणार इतक्यात तेथे भरत आणि शत्रुघ्नाचे आगमन झाले.ते म्हणाले कि,”आतापासून देवांची सेवा करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,तुम्ही आजपासून रजा घ्यावी !”,असे म्हणून रामप्रभूंची त्या सेवायादीला असलेली संमती त्यांनी हनुमंतांना दाखवली.हनुमंतरायांनी ती यादी काळजीपूर्वक पाहून ते त्यांना म्हटले,यामध्ये एक सेवा अनुल्लीखीत आहे,ती सेवा करण्याची परवानगी मला द्यावी.यावर कोणती सेवा ? अशी विचारणा झाल्यावर,”भगवंतांना जेव्हा जेव्हा जांभई येईल तेव्हा तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा माझ्याकडे द्यावी.”आता भगवंताना काही सतत जांभई येणार नाही”असा विचार करून त्या बंधुद्वयींनी या सेवेला होकार भरला.आता मात्र “बुद्धीमतां वरिष्ठं” असलेले मारुतीराय भगवंतांना केव्हाही जांभई येऊ शकते म्हणून सदासर्वकाळ त्यांच्यासोबतच असतं.मात्र रात्रीच्या वेळी प्रभुराम अंत:पुरात जात असताना हनुमंतांना तिथे मात्र प्रवेश दिला गेला नाही.ते खिन्न होऊन बाहेर एके ठिकाणी जाऊन बसले,त्यांच्या मनात आले की आता जर प्रभूरामांना जांभई आली तर...?  असा विचार येताच आपली सेवा खंडित होईल या भीतीने त्यांनी सारखी चुटकी वाजवण्यास सुरुवात केली,अंत:पुरात मात्र वेगळाच प्रकार घडत होता,बाहेर हनुमंत जसजश्या चुटक्या वाजवत होते तसतश्या प्रभू रामांना जांभया येत होत्या,सीतामाई घाबरून गेल्या,राजवैद्यांना पाचारण केले,त्यांनाही हा प्रकार कळेना,प्रभू तर एकामागून एक जांभयाच देत होते,त्यांनाही काही बोलता येईना,भरत-शत्रुघ्नाला सुद्धा काय प्रकार कळेना अखेर कुलगुरू वसिष्ठांना बोलावणे धाडले,त्यांनी काय तो प्रकार जाणून घेऊन भरत-शत्रुघ्नाकडे विचारणा केली की,हनुमंतराय कुठे आहेत,तेच सातत्याने चुटक्या वाजवत राहिल्याने प्रभू रामांच्या जांभया थांबत नाहीत.झाला प्रकार लक्षात येऊन भरत–शत्रुघ्नांनी हनुमंतांसमीप जाऊन त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली आणि त्यांचा सेवेचा अधिकारही नम्रपणे कबूल केला.

हनुमंतरायांच्या अलौकिक गुणांचा आपणही आदर्श घेऊन आपली बुद्धी,शक्ती आणि युक्ती दुर्जनांना दूर सारून सज्जनांसमीप जाण्यासाठी,दुर्गुणांवर मात करून सद्गुणांचा अंगीकार करण्यासाठी वापरावी.शक्तीचा उन्माद न बाळगता ती योग्य काळी,योग्य ठिकाणी सद्गुणांच्या आणि सद्गुणधाऱ्यांच्या रक्षणासाठी वापरावी,आपली बुद्धी भगवतचरणी लावून,भगवंतापासून परमार्थाची युक्ती प्राप्त करून घ्यावी.भक्तीने,साधनेने,सद्गुरूकृपेने संयमाची अधिक वृद्धी करून, आपल्याला आपल्या कल्याणासाठी,देवांच्या जवळ जाण्यासाठी सर्वप्रथम रामदूत हनुमंतरायांची करूणा भाकून,त्यांना शरण जाऊन,भक्तीच्या वाटा प्राप्त करून देण्याविषयी नम्रतेने विनंती करायला हवी.राष्ट्रोद्धाराकरता हनुमंतरायांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचीच आजच्या काळात आवश्यकता भासत आहे.किंबहुना काळाची पावले ओळखून स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे,“राष्ट्र निर्वीर्य होत चाललेले आहे,जागोजागी हनुमंतरायांची मूर्ती स्थापन करा आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करा”.

Wednesday, April 1, 2015

श्री क्षेत्र दत्तधाम आणि श्री संत श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे

-नितीन कळंबे

लेखाचे शीर्षक रायगड जिल्ह्यातील वाचकांना कदाचित नवखे असेल परंतु ते मुद्दाम देण्याचे कारण असे की,शीर्षकात अनुक्रमे उल्लेख केलेल्या दत्तधाम या परमपवित्र क्षेत्राविषयी आणि मामासाहेब देशपांडे या महान विभूतीमत्वाविषयी वाचकांना जिज्ञासा निर्माण व्हावी आणि या गोष्टींची माहिती घेऊन संबंधित स्थळाला भेट देऊन तिथल्या अध्यात्मिक वातावरणाचा लाभ आपल्या कल्याणासाठी करून घ्यावा यासाठीच या लेखाचे प्रयोजन...

८ मार्च रोजी श्री क्षेत्र दत्तधाम या पवित्र तीर्थक्षेत्राला २५ वर्षे पूर्ण होत आहेत तसेच फाल्गुन कृष्ण नवमी म्हणजे १५ मार्च या दिवशी मामासाहेब देशपांडे यांची पंचविसावी पुण्यतिथी आहे यानिमित्ताने मी पहिल्यांदाच श्री क्षेत्र दत्तधाम येथे भेट देऊन आलो तेव्हा त्या परिसरात कोंदटून राहिलेले चैतन्य,तेथील भुरळ पडणारा निसर्ग या गोष्टी वाचकांना कळाव्या यासाठीसुद्धा मुद्दाम हा लेखनप्रपंच मांडत आहे.

करुणाब्रह्म श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचा वारकरी संप्रदाय ह्या दोन्ही गोष्टी खूप अद्भुत आहेत.संप्रदायाला असलेली तत्वज्ञानाची पक्की बैठक,समता आणि सहिष्णुतेची शिकवणूक या गोष्टीमुळे हा संप्रदाय विश्वधर्म होईल यात कोणताही संदेह नसल्याचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी आवर्जून सांगितले आहे.महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नाथसंप्रदाय,दत्तसंप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे तीन संप्रदाय आढळतात या तीनही संप्रदायांच्या परंपरेत अनेक थोर महात्मे होऊन गेले यांतीलच एक थोर विभूतिमत्व असलेल्या मामासाहेब देशपांडे यांनी मांडलेल्या तीनही संप्रदाय समन्वयाचा सिद्धांतामुळे त्यांना दत्त संप्रदायाचे अध्वर्यू म्हटले जाते.या सिद्धांताने त्यांनी तत्वज्ञान क्षेत्राला अमौलिक देणगी देऊन ठेवली आहे. पूजनीय मामांचा या तीनही संप्रदायांच्या उपासना पद्धती व तत्वज्ञानाचा सखोल,शास्त्रीय आणि साक्षेपी अभ्यास होता त्यामुळे या तीनही संप्रदायाचे तत्वज्ञान व मूळ उपासना पद्धती ही एकच आहे हा महत्वपूर्ण सिद्धांत साधार आणि सप्रमाण प्रथम मामांनीच मांडला आहे.त्यांच्या साहित्यात जागोजागी यावर भाष्य केलेले आढळून येते.

श्री क्षेत्र दत्तधामसाठी नृसिंह सरस्वतींची प्रेरणा
१९८६ साली कलियुगातील द्वितीय दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामींनी पूजनीय मामासाहेब देशपांडे यांना आज्ञा केली की,आम्हाला राहण्यासाठी एक शांत स्थान निर्माण करा जिथे वाडी-गाणगापूर सारखी गर्दी होणार नाही.मामा अशा जागेच्या शोधार्थ असताना मामांचे उत्तराधिकारी शिरीषदादा कवडे कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना कोयना धरणावर अभ्यास दौऱ्यासाठी ते आले होते.तेव्हा तेथील रम्य परिसर पाहून पूजनीय मामांना येथील एक जागा घेऊन अर्पण करूया असा मनोदय त्यांनी मित्रांजवळ व्यक्त केला.आणि हा विषय तेवढ्यावरच थांबला.कालांतराने शिरीष दादांचे मित्र या ठिकाणी आले असता “हीच ती जागा,हीच ती जागा” असे दोनदा कुणीतरी आपल्या कानात स्पष्ट म्हटल्याचे त्यांना जाणवले त्यांनी तत्काळ शिरीष दादांकडे संपर्क केला.यानंतर पूजनीय मामांसोबत ही जागा पाहिल्यावर मामांनी साक्षात्कारानुसार या जागेचे महत्व कथन करून ही जागा विकत घेतली.

हे स्थान म्हणजे आजचे दत्तधाम होय.रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे अतिशय नयनरम्य परंतु पूर्णपणे अप्रसिद्ध असे क्षेत्र.चिपळूण मधून कुंभार्ली घाटमार्गे सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थान म्हणजे नाथ आणि दत्त संप्रदायाची प्राचीन तपोभूमी.नाथ संप्रदायातील दुसरे नाथ आणि विलक्षण विभूतिमत्व गोरक्षनाथ यांचे या भूमीवर काही काळ वास्तव्य होते.त्यांना भगवान परशुरामांकडून याच पवित्र भूमीवर श्री विद्येचा उपदेश झाला होता.त्यामुळे या क्षेत्राचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.

कुंभार्ली घाट संपल्यानंतर सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस असणारे हे क्षेत्र बाहेरून अगदीच नजरेस जाणवून येत नाही.रस्त्याच्या बाजूने लावलेला फलक ज्या पवित्र क्षेत्राकडे निर्देश करतो तिकडे मान वळवून पहिले तर प्रथमदर्शनी अतिशय गर्द वनराई मध्ये उंचच-उंच,डौलाने फडकत असणारी भगवी पताका दिसते.रस्त्यापासून थोडे खाली उतरले की रस्त्याला समांतर वाहणारी कोयना नदीची उपनदी “कापणा” नदी दिसते.या नदीवरून पर्वताच्या पायथ्यापर्यंत नेणारा पक्का बांधलेला पूल दिसून येतो हा पूल पार केल्यानंतर एक चित्तवेधक असे प्रवेशद्वार पाहिल्यावर आता आणखी आत काय असेल याबाबत आपली उत्कंठा वाढते.मग इथून वळणावळणाच्या पायऱ्या सुरु होतात,इतक्या गर्द जंगलामध्ये पक्क्या बांधणीच्या सुबक पायऱ्या बघून आपल्याला पावलोपावली आश्चर्य वाटत राहते.जंगलामध्ये सतत चाललेले पक्ष्यांचे सुमधुर कूजन,सुगंधी वारा सगळा शीण घालवून टाकतात.साधारण तीनशे पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दिसते ते दक्षिणेकडील गिरनार म्हणजेच श्री क्षेत्र दत्तधाम.

श्री क्षेत्र दत्तधाम येथील मुख्य मंदिरात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची भव्य पंचधातूची मूर्ती आहे.ही मूर्ती ज्या जागी गोरक्षनाथ महाराजांना अनुग्रह झाला त्याच जागी प्रतिष्ठापित आहे.ही मूर्ती सांगलीतील एका कारखानदाराने आपल्यासाठी बनवून घेतली होती मात्र ही मूर्ती पुण्यातील मामासाहेबांना देण्याविषयक त्यांना दृष्टांत झाला त्याप्रमाणे ही मूर्ती मामासाहेबांनी या मूर्तीची किंमत चुकती करून ती आपल्याकडे ठेवली.याशिवाय श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज यांची दोन फुट उंचीची पंचधातूची मूर्तीसुद्धा त्यावेळी मामासाहेबांच्या हस्ते प्रतिष्ठापित करण्यात आली.इथे असलेल्या शिवलिंगाविषयक सुद्धा अद्भुत कथा ऐकावयास मिळते.हिमालयामध्ये १९८२ साली एका साधूला स्वत: भगवान शिवांनी  हे शिवलिंग प्रसाद स्वरूपात देऊन ते पुण्यामध्ये मामासाहेबांना देण्याविषयक आज्ञा केली. हे काम साईरामबाबांनी यांनी केले आणि भगवान शिवाच्या आज्ञेप्रमाणे शिवलिंग मामासाहेबंकडे पोचते केले.हे शिवलिंग अतिशय दिव्य असून त्यावर नैसर्गिक रित्या भगवान शिवांचा तोंडावळा स्पष्ट दिसतो.दत्तधाम मधील देवदरबार असा अलौकिक आणि विलक्षण आहे.मुख्य मंदिराव्यतिरिक्त अजून सहा पुण्यस्थाने तेथे आहेत.मुख्य मंदिरासमोर श्री वरदविनायकांचे मंदिर आहे.शंभर मीटर अंतरावर दाट झाडीने वेढलेले गुरुपादुका मंदिर आहे.गडाच्या पायथ्याशी श्री रामदूत मारुतीरायांची सुबक आणि देखणी अशी मूर्ती प्रतिष्ठापित आहे.मामांच्या कृपेने एका खड्ड्यात झरा फुटून नंतर बांधून काढलेली चविष्ट व नितळ पाणी देणारी विहीर आहे.मुख्य मंदिर परिसराच्या वरील भागात श्री दत्त आश्रम आहे.या आश्रमात पुजारी व सेवेकरी राहतात.येथेच मामांचे नामसमाधी मंदिर आहे.पूजनीय मामांना देवांनीच दिलेल्या आज्ञेनुसार दत्तधाम येथील सर्व व्यवस्था ठेवली जाते.पुजारी व सेवेकऱ्यांव्यतिरिक्त कुणाचीही मुक्कामाची सोय येथे होऊ शकत नाही.सकाळी आठ ते साडेबारा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेतच मंदिर दर्शनाकरिता खुले असते.श्री दत्तजयंतीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक भाविकांना आजवर येथे अलौकिक अशा अनुभूती आल्या आहेत.
हा परिसर तितकासा प्रसिद्ध नाही.अध्यात्मिक क्षेत्रात याला अतिशय अजोड असे महत्व असले तरी स्वत: नृसिंह सरस्वती स्वामींनीच आम्हाला राहण्यासाठी एक शांत स्थळ निर्माण करा अशी आज्ञा केली होती किंबहुना याचमुळे की काय या अद्भुतरम्य अशा ठिकाणी फारशी वर्दळ दिसून येत नाही आणि श्रीपाद सेवा मंडळाकडून सुद्धा याबबत फारशी प्रसिद्धी केली जात नाही मात्र यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने वृत्तपत्रांत याबाबत प्रथमच माहिती प्रसारित केली गेली.


अतिशय सुंदर,निसर्गरम्य,पवित्र आणि मांगल्याने भरलेल्या या प्राचीन तपोभूमीचे दर्शन आपण एकदा तरी घ्यायलाच हवे.या पवित्र वातावरणातील अपूर्व शांती अनुभवणे हा स्वर्गीय सुखाचा प्रत्ययचं आहे.तेथील रम्य वातावरण हे शब्दांकित करणे कठीण आहे तेव्हा आपण त्या स्थानावर जाऊन समक्ष अनुभूती घेणेच अधिक श्रेयस्कर..