आवाहन

Saturday, August 3, 2013

।।दीन दुर्बळासी । सुखराशी हरीकथा।।1।।

                                              ।।दीन दुर्बळासी । सुखराशी हरीकथा।।1।।
                                             ।। तारु भवसागरीचे । उच्च नीच अधिकारी ।।धृ।।
                                             ।। चरित्र ते उच्चारावे । देवे केले गोकुळी ।।2।।
                                              ।। तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणउनि ।।3।।
                             

अर्थ-   कल्पना करा ,अनेक लोक संसाररुपी समुद्रस्नानाचा आनंद घेत आहेत,हा आनंद घेताघेताच ते हळूहळू अधिक खोलीकडे चालले आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग कामक्रोधलोभरुपी लाटांचा एकदम जोर वाढल्यावर त्यांना कळून चुकते की आता  किनार्‍यावर जाणे खूप कठिण आहे,ते लोक गटांगळ्या खाउ लागतात,येणारी जाणारी लाट त्यांना खेळण्याप्रमाणे   खेळवत राहते. यात काही पोहता न येणारे ,नवशिके तर काही पट्टीचे पोहणारे आहेत
आणि मग सगळयांची अशी अवस्था बघुन आमचे ''।। बुडती हे जन । न देखवे डोळा ।।'' या परोपकारी भावनेचे संत तुकोबाराय हरीनामरुपी जहाज हाकारत  तिथे येउन पोहोचतात आणि बुडणार्‍यांना उद्देशून म्हणतात,''या..!  या हरीनामरुपी जहाजात या ,देवाचे चरित्रगायन करा ,गुणवर्णन करा, त्याच्याविषयी आवड धरा कारण त्याच्याशिवाय तुमच्यावर कृपा करणारा त्रैलोक्यात कुणीही नाहीये, त्याच्यावर प्रेम करा ,त्याचे नामसंकीर्तन करुन मला जे सुख प्राप्त झाले त्याचा लाभ तुम्ही घेउन त्या बळावर हा भवसागर तरुन जा .

No comments:

Post a Comment