आवाहन

Wednesday, May 7, 2014

हरीहरेश्वर आणि अस्थिविसर्जन

सकाळी अगदी घाईने पोलाद्पुरातून निघालो.अस्थिविसर्जनाची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच होती.त्यांच्यानंतर पोहोचून काम होण्यासारखे नव्हते.एक वाजण्याच्या सुमारास हरिहरेश्वरला पोहोचलो.उन्हाने कहर केला होता, फार उकडत होते.त्यातही समुद्रावरून येणारा आल्हाददायक वारा होताच . एकाच वेळी उष्मा आणि थंडावा असं वातावरण अनुभवायला मिळतं होतं. 


दक्षिण काशी ...! हरिहरेश्वर ला दक्षिण काशी म्हणूनही ओळखतात.कोंकण किनारपट्टीतील आणखी एक नयनरम्य ठिकाण.गर्द वनराईने नटलेला परिसर मनाला शांती देऊन जातो.आकाशाला भिडलेल्या टेकड्यांचा उंचपणा आणि तितकीच समुद्राची खोल गंभीरता एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.नारळ-पोफळी च्या बागा जमिनीवर त्यांच्या झावळ्यांनी सावली धरतात.इथेच सावित्री नदी अरबी समुद्रास मिळते.बटू वामनाचे पहिले पाऊल इथे संपले अशी आख्यायिका आहे.अगस्ती मुनींनी येथे तपश्चर्या केली व त्यांना हरिहरेश्वराने दर्शन दिले.पांडवांनी आपल्या पितरांचे श्राध्द येथे केल्याचेही स्थानिकांकडून ऐकले.पहिल्या बाजीरावांनी सन १७२३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर रमाबाई पेशव्यांनी १७६८ मध्ये येथे "सनई चौघडा" वाजवण्याची पद्धत सुरु केली.शासनाने १९९० मध्ये हरिहरेश्वरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला.
डाव्या हाताला मंदिर परिसर,त्याच्या मागून शुक्लतीर्थाकडे जाणारी दगडी पायऱ्यांची वाट तर उजव्या बाजूला अथांग पसरलेला रत्नाकर सिंधू ,बाहेरूनच कालभैरवाला नमस्कार केला आणि अगदी घाईने (धावतच !)अस्थिविसर्जनाच्या घाटावर आम्ही गेलो सुदैवाने तो विधी करणारे श्री.बोडस हे ब्राह्मण नुकतीच एक क्रिया आटपून बाजूच्या धर्मशाळेत विसावलेले दिसले.धोतर,पंचा व हातात पूजेचा तांब्या या वेषावरून त्यांना ओळखणे फारसे अवघड गेले नाही.


मंदिर परिसरात जी दुकाने आहेत तिथे तुम्ही पूजेचं ताट विकत घेऊ शकता जे आम्ही घाई-गडबडीत विसरलो होतो.बोडस गुरुजींनी केळीच पान,प्रसाद व दोन नारळ आणायला सांगितले.सर्व क्रिया यथाविधी पार पडली(नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त त्याच परिसरात कावळ्यांची संख्या लक्षणीय होती).
महाबळेश्वर मध्ये उगम पावून सावित्री नदी ही पोलाद्पुरातूनच पुढे जाते तेव्हां या नदीत अस्थिविसर्जन केले तर चालेल का याविषयी गुरुजी म्हणाले,"हो ! चालू शकेल पण सोमवारांमध्ये  श्रावणी सोमवार जसा काही विशेष महत्व राखून आहे त्याचप्रमाणे हरिहरेश्वर मध्ये अस्थींच विसर्जन केल्याने मृतात्म्याला इतर ठिकाणांपेक्षा तत्काळ सद्गती लाभते. वेळेबाबत विचारले असता ते म्हणाले,"पूर्वी अशी काही ठरवलेली वेळ नव्हती त्यामुळे संध्याकाळी ६ वाजता तर कधी ७ वाजता असे लोक यायचे त्यामुळे एकाच ब्राह्मणासाठी एका दिवसात अशा अनियमित वेळांत क्रिया करणे हे अवघड व्हायचे त्यामुळे ही वेळ ठरवून घेतली आहे या वेळेनंतर (दुपारी २ वाजल्यानंतर ) अस्थिविसर्जन शक्य नाही".

यानंतर काळभैरव व योगेश्वरी यांचे दर्शन घेतले(उत्तर काशीप्रमाणे येथेही प्रथम काळभैरवाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे).पुण्यातील पेशव्यांचे काळभैरव हे कुलदैवत आहे. या मंदिरातून बाहेर निघाल्यास हरिहरेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे.येथे ब्रह्म,विष्णू,शिव,पार्वती या देवता लिंग रूपाने वसलेल्या आहेत.याच लगत सिद्धिविनायक व हनुमंताचे मंदिर आहे. येथील मंदिरांना कळस नसून कोंकणात हमखास आढळणारी कौलारू छपरे आहेत.

वारकरी संप्रदायातील हरी आणि हर एकच असल्याचा महत्वाचा सिद्धांत या तीर्थक्षेत्री पहावयास मिळतो.हरीची निंदा करून हर भजला  किंवा शिवाला निंदून विष्णू भजला तरी यातील कोणतेही भजन फलदायी होणार नाही हा सिद्धांत येथील मूर्तीत पहावयास मिळतो.शिव पुराणांत नृसिंह अवतार शिवाचा तर विष्णुपुराणात विष्णूचा सांगितला आहे.दोघांच्या अनेक असणाऱ्या नामांत सुद्धा कमालीचे साम्य आहे.विष्णूसहस्त्रनामांत विष्णूचे एक नाव शिव असे आहे.संत नरहरी सोनार यांची गोष्ट याबाबतीत फार प्रसिद्ध आहे.  
   
मंदिर परिसर निर्मळ व शांत आहे.मूर्ति अतिशय प्रसन्न आहेत.पुढे विस्तीर्ण सभामंडप आहे.माहिती दर्शवण्याकरिता विविध फलक लावलेले आहेत.

पुढे प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुकाने,उपहारगृहे आहेत.इथे तुम्ही प्रसादासाठी लाडू,कुरमुरे,पेढे घेऊ शकता तसेच सरबते,खेळणी,टोप्या,किचेन्स,शंख शिंपल्यांच्या वस्तू घेऊ शकता.शहाळी घ्यावयाची असतील तर अस्थिविसर्जनाच्या घाटावरच जावे लागेल.सरकारी तसेच खासगी राहण्याची सोय,हॉटेल्स मध्ये शाकाहारी/मांसाहारी जेवण,पार्किंग,जलक्रीडेसाठी स्पीड बोट,मोटार बाईक इत्यादी सोयी इथे आहेत.

देवाच्या घरी जाऊन सुद्धा उंबऱ्यातूनच परत यावं लागल्याची हुरहूर आहे.समुद्रतटावर धडका देणाऱ्या लाटांनी दगडी भिंतीच्या काळजात केलेली घर जवळून पहायची आहेत.प्रत्येक लाटेबरोबर किनाऱ्यावर येणाऱ्या खेकड्यांची परत समुद्रात जाण्याची लगबग पहायची आहे.

अगणित रत्ने साठविलेल्या या सागराच्या स्फटिकाच्या पाण्यात किमान पाय तरी भिजवायचे आहेत.कृष्णधवल नरम वाळूत माझ्या पाऊल खुणांचे ठसे आपली मर्यादा कायम राखणाऱ्या सागराकडून पुसले जाताना पहायचं आहे. टेकड्या पहायच्या आहेत,त्यांना प्रदक्षिणा घालायची आहे तीर्थाचं महत्व समजून घ्यायचयं अजून बरचं काही.पूर्ण हरिहरेश्वर व्यवस्थित फिरून पाहता आलं नाही परंतु मन त्या वैभवाकडे पुन्हा ओढ घेत आहे.पुन्हा कधीतरी राहिलेली भटकंती पूर्ण करण्याचा मानस आहे.-नितीन कळंबे




किनाऱ्यावर वाहून आणलेल्या भग्न मूर्ति-
                                                                                                                                                                 



No comments:

Post a Comment