आवाहन

Sunday, April 5, 2015

शरण शरण हनुमंता ...--नितीन कळंबे

शरण शरण हनुमंता ...



हनुमंत हे काय रसायन आहे हे अतिशय मार्मिक शब्दांत संत तुकाराम महाराज सांगतात,ते म्हणतात “ऐसा प्रतापी गहन | सकळ भक्तांचे भूषण ||”.हनुमंत हे सर्व जगतामध्ये प्रतापी तर आहेतचं परंतु यापेक्षाही त्यांच्या ठिकाणी असलेल्या रामभक्तीमुळे त्यांचे आस्तित्व सर्व भक्तांत विशेषत्वाने उठून दिसते.तुम्हा-आम्हाला हनुमंत हे केवळ बालपणी सूर्याचा ग्रास करण्याला उड्डाण करणारे, समुद्र उल्लंघून जाणारे,लंकादहन करणारे,द्रोणागिरी पर्वत एका हातात उचलून आणणारे,पाताळातून प्रभू राम आणि लक्ष्मण यांना सोडवून आणणारे,राक्षसांशी लढणारे अशा अर्थी परिचित असतील,याहीपुढे एकनिष्ठ रामभक्त,आजन्म ब्रह्मचारी म्हणूनही त्यांची माहिती आपल्याला असेल परंतु भक्तीच्या प्रांतात महायोगी श्रीहनुमंतरायांचे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असलेले स्थान हे केवळ संतांनी जाणून त्यांना त्रिवार नमन केले आहे,केवळ म्हणूनच प्रभूरामांचे अनन्यभक्त म्हणून ख्याती पावलेल्या हनुमंतरायांना भक्तामाजी अग्रणी असलेले तुकोबाराय हनुमंतांनी त्यांना भक्तीचा मार्ग दाखवावा म्हणून विनंती करतात.

दास हनुमंत आणि वीराग्रणी हनुमंत -  स्वत: हनुमंतांचे अवतार असलेल्या समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतरायांची जी मंदिरे उभारली त्यामध्ये काही मंदिरांत "
“भीमरूपी महारुद्र,वज्रहनुमान मारुती”
असे सामर्थ्य असणारे,वीर्यवान,पराक्रमी,चिरंजीवी,वीर हनुमंत राक्षसांचे निर्दालन करण्याच्या अविर्भावात आहेत तर काही मंदिरात हृदयामध्ये निरंतर नामस्मरण करणारे बलभीम मारुती प्रभूरामासन्मुख हात जोडून दास्यभावाने नम्रपणे उभे आहेत.हनुमंतरायांच्या अपरिमित पराक्रमाच्या कथा तर सर्वांना माहीतच आहेत.रामायण,महाभारत,पुराणे आदि ग्रंथांत आपण बलवान आणि बलाढ्य अशा दैत्यांच्या विविध कथा वाचतो.दैत्यांच्या ठिकाणी सुद्धा शक्ती असते,अमाप बळ असते परंतु या बळाला उन्मादाची,क्रौर्याची,अहंकाराची जोड असते त्यामुळे ते अपरिमित बळ भगवत्कृपेला प्राप्त होत नाही,याउलट हनुमंतराय हे अपरिमित बळ असूनसुद्धा स्वत:ला भगवंतांचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतात त्यामुळेच त्यांच्यावर भगवंतांची निरंतर कृपा राहून ते भक्तीमार्गात सुद्धा श्रेष्ठत्वाला पावलेले वीर झाले.संत साहित्याचे प्रगाढ अभ्यासक प.पू.शिरीष दादा कवडे म्हणतात,अहंकार हा परमार्थमार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे.भगवंतांचे परिपूर्ण प्रेम साधावयाचे असेल तर साधकाचा अहंकार प्रथम समूळ जायला हवा.आणि तो तसा जाण्यासाठी त्याने स्वत:ला कमी दर्जाचे,तुच्छ,क्षुद्र मानले पाहिजे.जे नुसतीच ग्रंथांची पोपटपंची करतात त्यांची अशी समजूत असते की,”दास्यभक्ती मुळे साधक दुबळा आणि पराधीन होतो!””शिवाय;कोणाचीही गुलामगिरी का व कशासाठी करायची ?” असाही किंतु त्याच्या मनात असतो.त्याच्या या समजुतीचा अर्थ परमार्थात: एवढाच असतो की,”त्यांनी खरे तत्वज्ञान समजूनच घेतले नाही”.
    
“दास्य” या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपण हनुमंतरायांच्या दास्यभक्तीला लावू नये तर परमार्थमार्गात  दास्य म्हणजे आपला अहंकार उत्तरोत्तर कमी करीत जाणे,असा आहे.या दास्यभावाचे प्रभूरामांवरील  प्रेम किती अलौकिक असावे यासंबंधी एक कथा सांगतात.एके दिवशी भरत आणि शत्रुघ्न विचार करतात,”हनुमंतराय देवांपुढे सतत उभे असतात,देवांची प्रत्येक कामे करायला सदैव तत्पर राहतात यावरही कडी म्हणून की काय देवांनी स्वमुखाने काही सांगण्याआधीच त्यांची इच्छा जाणून ती ते पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतात,त्यामुळे आम्हाला देवांची सेवा करावयाची संधीच मिळत नाही”,असा विचार करून एक दिवस हनुमंतराय स्नानादी कर्मांसाठी शरयू नदीवर गेले असता ही संधी साधून भरतशत्रुघ्न बंधुद्वयींनी देवांच्या सेवेला कोणत्या गोष्टी लागतील,कोणती सेवा कोणत्या वेळेत व्हायला हवी अशी यादी तयार केली आणि ती यादी रामरायांपुढे सादर करून त्यांची अनुमती मिळवली.इकडे हनुमंतराय स्नान आटोपून प्रभूंना पूजेसाठी फुले आणावयास जाणार इतक्यात तेथे भरत आणि शत्रुघ्नाचे आगमन झाले.ते म्हणाले कि,”आतापासून देवांची सेवा करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,तुम्ही आजपासून रजा घ्यावी !”,असे म्हणून रामप्रभूंची त्या सेवायादीला असलेली संमती त्यांनी हनुमंतांना दाखवली.हनुमंतरायांनी ती यादी काळजीपूर्वक पाहून ते त्यांना म्हटले,यामध्ये एक सेवा अनुल्लीखीत आहे,ती सेवा करण्याची परवानगी मला द्यावी.यावर कोणती सेवा ? अशी विचारणा झाल्यावर,”भगवंतांना जेव्हा जेव्हा जांभई येईल तेव्हा तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा माझ्याकडे द्यावी.”आता भगवंताना काही सतत जांभई येणार नाही”असा विचार करून त्या बंधुद्वयींनी या सेवेला होकार भरला.आता मात्र “बुद्धीमतां वरिष्ठं” असलेले मारुतीराय भगवंतांना केव्हाही जांभई येऊ शकते म्हणून सदासर्वकाळ त्यांच्यासोबतच असतं.मात्र रात्रीच्या वेळी प्रभुराम अंत:पुरात जात असताना हनुमंतांना तिथे मात्र प्रवेश दिला गेला नाही.ते खिन्न होऊन बाहेर एके ठिकाणी जाऊन बसले,त्यांच्या मनात आले की आता जर प्रभूरामांना जांभई आली तर...?  असा विचार येताच आपली सेवा खंडित होईल या भीतीने त्यांनी सारखी चुटकी वाजवण्यास सुरुवात केली,अंत:पुरात मात्र वेगळाच प्रकार घडत होता,बाहेर हनुमंत जसजश्या चुटक्या वाजवत होते तसतश्या प्रभू रामांना जांभया येत होत्या,सीतामाई घाबरून गेल्या,राजवैद्यांना पाचारण केले,त्यांनाही हा प्रकार कळेना,प्रभू तर एकामागून एक जांभयाच देत होते,त्यांनाही काही बोलता येईना,भरत-शत्रुघ्नाला सुद्धा काय प्रकार कळेना अखेर कुलगुरू वसिष्ठांना बोलावणे धाडले,त्यांनी काय तो प्रकार जाणून घेऊन भरत-शत्रुघ्नाकडे विचारणा केली की,हनुमंतराय कुठे आहेत,तेच सातत्याने चुटक्या वाजवत राहिल्याने प्रभू रामांच्या जांभया थांबत नाहीत.झाला प्रकार लक्षात येऊन भरत–शत्रुघ्नांनी हनुमंतांसमीप जाऊन त्यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली आणि त्यांचा सेवेचा अधिकारही नम्रपणे कबूल केला.

हनुमंतरायांच्या अलौकिक गुणांचा आपणही आदर्श घेऊन आपली बुद्धी,शक्ती आणि युक्ती दुर्जनांना दूर सारून सज्जनांसमीप जाण्यासाठी,दुर्गुणांवर मात करून सद्गुणांचा अंगीकार करण्यासाठी वापरावी.शक्तीचा उन्माद न बाळगता ती योग्य काळी,योग्य ठिकाणी सद्गुणांच्या आणि सद्गुणधाऱ्यांच्या रक्षणासाठी वापरावी,आपली बुद्धी भगवतचरणी लावून,भगवंतापासून परमार्थाची युक्ती प्राप्त करून घ्यावी.भक्तीने,साधनेने,सद्गुरूकृपेने संयमाची अधिक वृद्धी करून, आपल्याला आपल्या कल्याणासाठी,देवांच्या जवळ जाण्यासाठी सर्वप्रथम रामदूत हनुमंतरायांची करूणा भाकून,त्यांना शरण जाऊन,भक्तीच्या वाटा प्राप्त करून देण्याविषयी नम्रतेने विनंती करायला हवी.राष्ट्रोद्धाराकरता हनुमंतरायांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचीच आजच्या काळात आवश्यकता भासत आहे.किंबहुना काळाची पावले ओळखून स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे,“राष्ट्र निर्वीर्य होत चाललेले आहे,जागोजागी हनुमंतरायांची मूर्ती स्थापन करा आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करा”.

No comments:

Post a Comment