आवाहन

Friday, October 31, 2014

|| धन्य भाग्य जया | जे पंढरपूर देखिती ||

|| धन्य भाग्य जया | जे पंढरपूर देखिती ||




लेखक-नितीन कळंबे

“पंढरपूर” या एका शब्दाने गेल्या आठशे वर्षात जनसामन्यांच्या मनात गारुड निर्माण केले आहे.महाराष्ट्रातील गेल्या आठशे वर्षाचे अध्यात्मिक जीवन या एका शब्दाभोवती रुंजी घालत फिरत आहे.एका क्षेत्राचा क्षेत्रमहिमा इतका वादातीत असेल तर याठिकाणचा क्षेत्रज्ञ कसा आहे हे जाणून घ्यायचे झाल्यास त्याची वर्णने संतांनी आपल्या साहित्यात करून ठेवली आहेत ही वर्णने वाचली तर “पंढरपूर“ ह्या शब्दाने गेली आठशे वर्ष जनसामान्यांमध्ये कशी मोहिनी घातली याचे उत्तर मिळेल.

या क्षेत्रज्ञाचे नाव आहे “विठ्ठल”.जणू परब्रह्मचं साकार होऊन पंढरीस आले आहे अशी सर्व संतांची भावना आहे.”म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे | त्याचे बोल नाइकावे” असे तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात सांगतात.किंवा विठ्ठलास वगळून जे ब्रह्मतत्वाचा उपदेश करत असतील तर अशा कोरड्या बोलांकडे लक्ष देऊ नये असेही संत प्रतिपादन करतात.

पंढरपूरचा क्षेत्रमहिमा

तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला || ही तुकाराम महाराजांची एक ओवीच पंढरपुरचे महात्म्य सांगण्यास पुरेशी आहे.ऋणातून,कार्यातून,लौकिक कर्तव्यातून एकवेळ मुक्तता होईल मात्र पुन्हा पुन्हा पृथ्वीतलावर जन्म घेऊन गर्भयातनांचे जे दु:ख भोगावे लागते त्या दु;खापासून सुटका करणारा वैद्य केवळ पंढरीराव आहे असे संत सांगतात.मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही प्रचलित म्हण आहे मात्र याची देही याची डोळा स्वर्गसुख अनुभवायचे असेल तर ते पंढरपुरात या असे आवाहन सकल संत एकमुखाने करताना दिसतात.सर्व तीर्थांमध्ये पंढरी तीर्थ श्रेष्ठ आहे,यापुढेही जाऊन सर्व तीर्थांचे मूळ पंढरी आहे असे संत सांगतात.

दुष्ट आणि अभक्त लोक पंढरीसी जाऊन सुष्ट आणि भक्त होतील.पंढरीचे वारकरी हेच मोक्षाचे अधिकारी आहेत.पंढरी म्हणजे चंचल मनाचा विसावा.जन्माला येऊन जर कोणते पुण्य जोडायचे असेल तर ते म्हणजे पंढरीची वारी होय असा विश्वास संतसाहित्यात ठायी-ठायी दिसून येतो.

संतांना वारीची ओढ

एखाद्या सासूरवासी लेकीला माहेरची ज्या तीव्रतेने ओढ वाटते अगदी तशीच ओढ संतांना,वारकऱ्यांना पंढरपुराबद्दल वाटते.”सासुरवास भितो जीव ओढे तुजपासी” अशी भीती व्यक्त करून संत लौकिक आणि अलौकीकामध्ये लज्जारक्षण करण्याविषयी देवाला विनवतात.पंढरीची वारी करण्याबद्दल जणांना संत उपदेश करतात,वारी केल्याने प्राप्त होणारी फळे सांगतात.किंबहूना संत स्वत:च तीर्थाटन आणि वाऱ्या करून दाखवतात आणि “म्हणुनी विशेषे आचरावे | लागे संती” असे ज्ञानेश्वर का म्हणतात हे सुद्धा आपल्याला कळून येते.वारी करताना घडणारे शारीरिक तप,मानसिक,वाचिक तप ही परमार्थ सिद्धतेच्या दृष्टीने आवश्यक असणारी अंगे वारीत खेळीमेळी आणि अनायासे घडतात.पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांकडे कधी संत विठ्ठलाला निरोप पाठवताना दिसून येतात.”अरे विठ्ठला मला इकडे सासुरवासाला धाडलेस परंतु मला निरंतर तुझाच ध्यास आहे.रात्रंदिवस तुझे ध्यान आम्ही करत असताना तू का एवढा निष्ठुर झालास ? “असा भावपूर्ण निरोप संत विठ्ठलाला धाडतात.

आज बहुसंख्येने वारकरी पंढरीत दाखल होतील.कोकणातील वारकरी आज प्रवासाला निघतील तर पायी वाऱ्या दशमी/एकादशी पर्यंत पंढरपुरात डेरेदाखल होतील.वाहतुकीची इतकी साधने असताना पायी वारीचे दिव्य करून घडणारे शारीरिक तपाचे पुण्य निश्चितच अमाप आहे.सहस्त्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञांचे पुण्य पंढरपूरच्या वारीच्या पासंगालाही पुरत नाही असे पद्यपुराणात सांगितले आहे.चैत्र आणि माघी एकादशी या महत्वाच्या आहेतच पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन महान एकादशी म्हणून गणल्या जातात.”आषाढी कार्तिकीला नामदेवा,मला विसरू नकोस”असे खुद्द पांडुरंगाने नामदेवाला सांगितले आहे.हरी-हर एकचं असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीला खूप महत्व आहे.कार्तिकी एकादशी दिवशी शंकराला तुळशीपत्र तर विष्णूला बेल वाहणे म्हणजे हरी-हर ऐक्याच्या तत्वाज्ञांचे उपयोजन होय.




No comments:

Post a Comment