
।। सुख वाटे हेचि ठायी । बहु पायी संतांच्या ।।1।।
।। म्हणउनि केला वास । नाही नाश तये ठायी ।।धृ।।
।। न करवे हालीचाली । निवारीली चिंता हे ।।4।।
।। तुका म्हणे निवे तनू । रजकणू लागता ।।3।।
स्पष्टीकरण-संत तुकोबांचे ध्येय पारमार्थिक सुख आहे आणि ते कूठे मिळेल,त्यासाठी काय करावे लागेल व त्या सुखाने नक्की काय होईल याविषयी त्यांना पूर्ण कल्पना आहे.
वरील अभंगातून महाराज सूचवितात की हे पारमार्थिक सुख संताच्या पायांपाशी विपुल प्रमाणात आहे.(आता पायापाशी सुख आहे याचा अर्थ त्यांचे पाय जीवी धरल्याशिवाय म्हणजेच त्यांना शरण गेल्याशिवाय ते मिळणार नाही हे उघड आहे.)
या सुखासाठी तुकोबांनी संतचरणावर भाव लीन केला आहे.संत उत्पत्तिनाशाच्या पलीकडे असल्यांमुळे त्यांच्याकडून प्राप्त होणार्या सुखाला सुद्धा नाश नाही,कालबाधा नाही हा त्यांचा निश्चय आहे.
हा निश्चय झाला आणि मग मनाची चंचलता थांबली.(।।आता कोठे धावे मन?।।) नाना मार्गांकडे धावण्याची धरसोड वृत्ती स्थिर झाली.तुकोबांच्या अध्यात्मिक उन्नतीची जबाबदारी संतांनी त्यांच्या शीरावर घेतली.(।।तुम्हा संतावरी ओझे.।।) त्यांच्या या प्रेमामुळे तुकोबांच्या चित्तवृत्ति स्थिर होउन ते सुखरुप झाले.
No comments:
Post a Comment