आवाहन

Saturday, May 31, 2014

किल्ले कांगोरीगड उर्फ मंगळगड (Fort Kangorigad/Mangalagad )

आतापर्यंत डोक्यावर असणार्या गर्द हिरवाईच्या आच्छादनाने उन्हापासून आमचा चांगलाच बचाव केला होता.सरळ-सोट वाढलेले मजबूत बुंध्यांचे मोठ-मोठाले वृक्ष आणि त्यांना गच्च लपेटलेल्या वेड्यावाकड्या वेलींनी त्या पायवाटेवर मंडप तयार केला होता.एकदाचे त्या झाडा-झुडूपांतून बाहेर आलो आणि समोर दिसला तो काळाकभिन्न 

सरळसोट कातळ.काटकोनात फिरलेला कातळ येणाऱ्या चपळ हवेला अलगद फिरवीत होता. इतकी तीव्र चढाई करून आल्याचे चीज झाल्यासारखे वाटले.अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या,आतापर्यंत कुरकुरणारे पाय त्यांच्या वेदना अचानक विसरून गेले होते.वेदनाशामक सौंदर्य... खरचं मन सौंदर्यात रमते,खूप रमते.मानसिक वेदना तर सोडाच शारीरिक वेदना ही अशा अनवट सौंदर्यात विसरल्या जातात.वाऱ्याने लवणारं पोपटी गवत पाहत काही वेळ त्या विशाल कांगोरीगडाच्या पायथ्याशी आम्ही विसावलो...

२९ मे ला घरचा फोन खणाणला.फोन वर श्री.अनिल मालुसरे होते."कांगोरीगड स्वच्छता मोहीम राबवायची आहे,तू येणार का ?" अशी विचारणा केली.मी तात्काळ
होकार दिला.
कांगोरीगड हा महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड.चंद्रराव मोर्यांकडून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.आणि याचे नामकरण "मंगळगड" असे केले.या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी होत असे.संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला तेव्हां तेथील धन प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा येथे नेले.सुमारे १८१७ या सालात सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकार्‍यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कर्नल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला. स्थानिक लोक याला कांगोरीगड म्हणूनच ओळखतात.त्यामुळे इथे येऊन "मंगळगड कुठे आहे?" अशी विचारणा केली तर गावकर्यांकडून "माहित नाही" असेचं उत्तर मिळेल.किल्ल्यावर जाण्यासाठी महाड पासून दीड तास अंतरावरील पिंपळवाडी इथून जवळ-जवळ किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत चारचाकी वाहन जाऊ शकेल असा कच्चा रस्ता बांधला आहे.तर दुसरा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे २४ किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे.तसेच सडे गावाच्या पुढे वडघर गावातून सुद्धा दोन रस्ते आहेत.पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी ६ तास लागतात मात्र एकाच वेळी चंद्रगड आणि कांगोरीगड करायचे असल्यास गिर्यारोहक हा सुद्धा मार्ग अवलंबतात.तसेच वरंध घाटातील माझेरी या गावातून ६ तासांचे अंतर आहे.ढोरवाटा जरी भरपूर असल्या तरी किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती ओळखणे सोपे आहे.जरा मान उंच करून पहिले तर व्यक्तींच्या आकाराचे दोन सुळके तुम्हाला दिसतील यालाच स्थानिक नवरा-नवरीचे सुळके म्हणतात.गडावर जाण्याची एकमेव वाट ह्या सुळक्याच्या खालूनच जाते.हा सुळका नजरेच्या टप्प्यात ठेवला तर साहसवीरांसाठी कुठूनही गडावर चढाई करता येईल.पिंपळवाडीतून जाणारी गडावर जाणारी वाट ही प्रसिद्ध मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुद्धा बांधला आहे परंतु साहसाची आवड असणाऱ्या तरुणांनी सडे या गावातून चढण्यास हरकत नाही.सरासरी २ तासांत चढाई पूर्ण होते..
सकाळी आठ वाजता चढाईला सुरुवात केली.एक तासाने गोठवली इथून येणारी वाट आणि सडे इथून येणारी वाट ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत मिळतात.आणि दीड तासाने पिंपळवाडीतून येणारी वाट आणि आपली वाट यांचे मिलन होते.प्रवेशद्वारअगदीच भग्नावस्थेत असल्याने ओळखू येत नाही परंतु शेजारील विटांचे गोलाकार बांधकाम बघून प्रवेशद्वाराची कल्पना आपण करू शकतो.तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला निमुळती होत जाणारी माची आणि उजव्या हाताला बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते.उजव्या हाताला कातळात खोदलेले पाण्याचे दोन टाके आहेत तर समोर कांगुरीनाथाचे मंदिर आहे.

गाभाऱ्यात कांगुरीनाथासह काळभैरव,तसेच शिवलिंग आणि घोड्याच्या ५ मुर्त्या आहेत.तसेच इतर दोन मुर्त्या आहेत.बाहेरील सभामंडपात आणखी काही भग्नावस्थेतील मुर्त्या आहेत.स्थानिक लोक इथे देवाला
राखण(बळी) देतात.सभामंडपातच नैवेद्य शिजवण्यासाठी भांडी आहेत.(बादली,मोठाले टोप,पलेता,तांब्या,ताट इ.).इथेच चूल मांडल्याने राख उडून मंदिर परिसर अस्वच्छ झाला होता तसेच कोंबड्यांची पिसे तिथेच टाकल्याने मंदिराच्या पावित्र्याला बाधा येत होती.आम्ही प्रथम गाभारा नंतर सभामंडप स्वच्छ करून दीप प्रज्वलित केला.काही क्षणातच उदासीन वाटणारा परिसर मंगल आणि पवित्र वाटू लागला.

मंदिराच्या पाठीमागे जाणाऱ्या माचीवरून नयनरम्य दृश्य दिसते.माचीला जवळ-जवळ अर्धा किलोमीटर आणि २०-३० फुट उंच तटबंदी आहे
.इथून ढवळी व कामथी नद्यांचे खोरे पूर्ण दृष्टीच्या टप्प्यात येतात.मघाशी पाहिलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांपैकी लहान असलेल टाकं स्वच्छ करताना आम्हाला त्यात मेलेला साप आढळून आला.दोन्ही टाकं त्यातली घाण काढून आम्ही अंशतः स्वच्छ केली.
उजव्या हाताला असणार्या वाटेवरून आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो.वाट सुरुवातीला अत्यंत निमुळती असून एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो,तेव्हां जरा जपून..!

५० मीटर अंतरावर गडावरील सर्वात मोठे टाके असून यातील पाणी तुलनेने स्वच्छ आहे.गडावरील या टाक्यात बारमाही पाणी असते.(पाण्याचा अगदीच तुटवडा असल्यास येथील पाणी पिण्यास हरकत नाही).

बालेकिल्ल्यावर तीन वाड्यांचे भग्न अवशेष आहेत.सुरुवातीला नुसता जोता असून त्याच्यापुढे दोन सुंदर घडवलेली
शिवलिंग आहेत.

पुढील दोन वाड्यांच्या भिंती दोन पुरुष उंच असून त्यांना एकच खिडकी असलेली दिसते.
कदाचित यांचा वापर कैदी ठेवण्याकरता होत असावा.या वाड्यांच्या मागे जाणारी वाट आपल्याला तटावर घेऊन जाते.इथून (जपून) खाली पाहिल्यास आपण ज्या वाटेने आलो त्या वाटेचा अंदाज येऊ शकतो.हा तट २०-३० फुट बांधकाम करून बांधून काढला आहे

.मात्र गडावर फिरताना एक गोष्ट लक्षात ठेवावी,इथे जी माती आहे तिला "गांडूळकी"ची माती म्हणतात जी अत्यंत भुसभुशीत आहे त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता खूप आहे.मातीचा गुण म्हणजे अत्यंत सुपीक त्यामुळे एक पाउस पडला तरी गवत गुडघाभर उंच वाढते.त्याचबरोबर गडावर झाडे सुद्धा खूप आहेत.कडीपत्ता आणि काटेरी वांग्याची झाडे सुद्धा आहेत.
आता जेवणाची वेळ.येताना डब्बे आणलेच होते.भरपेट जेवलो.थोडावेळ विश्रांती घेतली आणि संध्याकाळी उन्ह खाली झाल्यावर उतरायला सुरुवात केली.काळाकभिन्न कांगोरीगड एवढी हिरवीगार सृष्टी अंगावर खेळवत निवांत पहुडला होता.जसजसे खाली उतरत होतो तसतसा वारा जोरात वाहत होता.कदाचित कड्या-कपाऱ्यातून,तटांच्या
भगदाडातून तो वारा कांगोरीगडाला महाराष्ट्रातील इतर दुर्ग-सवंगड्यांच्या गोष्टी ऐकवत असावा..
लेखन व छाया - कु.नितीन कळंबे
(आम्ही सवंगडी-अनिल मालुसरे,सुभाष जाधव,मनोज जाधव,नितीन कळंबे,रुपेश मालुसरे,अक्षय मालुसरे,गणेश मालुसरे,राकेश मालुसरे )

No comments:

Post a Comment