आनंदाचा काला गोपाळकाला
-नितीन कळंबे
काल सगळीकडे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाली.देवाने पृथ्वीतलावर
जन्म घेतला म्हणून जन्माष्टमी आणि गोकुळात प्रवेश केला म्हणून गोकुळाष्टमी साजरी
केली जाते.भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक लाघवात गूढ अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.प्रत्येक
जीव हा बंदिशाळेतच जन्माला येतो आणि ती बंदिशाळा फोडून जो बाहेर येतो तोच श्रीकृष्ण
परमात्मा होय.तुम्ही-आम्ही या विकाररुपी बंदीशाळेत अडकून पडलो आहोत त्यामुळे आज या
पवित्र गोकुळअष्टमीच्या दिवशी बंदिशाळेतून स्वातंत्र्याच्या दिशेने,बद्धतेतून
मुक्ततेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण आपल्या विचारांना गती द्यायची आहे.
भगवान श्रीकृष्णाचे लाघव,त्याच्या लीला मधुराभक्तीतून संतांनी समजावून
सांगितल्या आहेत.भगवंतावरील प्रेमाची उत्कट अवस्था सकलसंतरचित बाळक्रीडा ,गौळणी,काल्याच्या
अभंगांतून दिसून येते.मात्र हे अभंग द्वयर्थी असून एकीकडे प्रेमभक्तीचा अत्युच्च
अविष्कार तर दुसरीकडे तितकेच खोल तत्वचिंतन.हे तत्वचिंतन सर्वसामान्यांना आकलन
होण्यासारखे नसल्याने “चरित्र ते उच्चारावे” असं तुकोबाराय म्हणतात.देवाने गोकुळात
ज्या लीला केल्या त्या लीलांचा केवळ उच्चार करण्याविषयक ते सांगतात कारण
त्याच्यातील गूढ स्पष्टार्थबोधक नसल्याने त्याच्या मानवी बौद्धिक पातळीवर केलेल्या
आकलनातून भगवान परमात्म्याविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रयोजन भक्ताचे ऋण फेडण्याकरिता,दुष्टांच्या
संहाराकरता असल्याचे संतांनी स्पष्ट सांगितले आहे.परीपूर्णतम अवतार असलेले भगवान
कृष्ण श्रावण वद्य अष्टमीस,रोहिणी नक्षत्री,दोन प्रहर रात्री,बुधवारी जन्मास आले.जन्माला
येण्याआधीच चरित्राला सुरुवात केलेला हा बाळकृष्ण नाना-खोड्या करू लागला.बाळ-गोपाळ
गौळणींना आपल्या लीलांनी रिझवू लागला.एक कोटी गाईंचा स्वामी असलेल्या नंद राजाच्या
हा पुत्र कधी राजसत्तेच्या अहंकारात वाढला नाही.आपल्यापेक्षा लौकिक दर्जाने कनिष्ठ
असलेल्या उपनंद,नंद,वृषभानू,वृषभानुवर यांच्या मुलांशी,गोपालांशी तो खेळू लागला.ही
समतेची शिकवण म्हणता येणार नाही काय? समाजाच्या सर्व स्तरात मिळून-मिसळून राहणारा
हा नंद्पुत्र पुढे कसा आखिल मानव समाजाला धर्माची दृष्टी देता झाला हे आपणा सगळ्यांना
ज्ञात आहे.
आपण मथुरेतील परकीय ताकदीला घाबरून गोकुळातून शक्तिवर्धक असलेले दुध
आणि दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर मथुरेत निर्यात करत आहोत हे चाणाक्ष
कृष्णाला कळून आले.स्वतःच्या पित्याला कैदेत ठेवून राज्य उपभोगणाऱ्या
जुलमी,नीतिभ्रष्ट कंसामुळे प्रजा संत्रस्त झाली होती.गोकुळातील दुध आदि खुराक खाऊन
मुष्टिक-चाणूर इत्यादी मल्ल बलवान होत चालले होते तर गोपाळ त्यांच्या तुलनेत अशक्त
बनत चालले होते.नवनीत मथुरेत जाऊन घरी राहिलेल्या असार ताकाशिवाय गोपाळांना दुसरे
काही मिळत नव्हते.तेव्हा राष्ट्रनिर्माणासाठीच भगवंतांनी हे चौर्यकर्म आरंभले.अधर्म-प्रवृत्तीचे
निर्मुलन करण्यासाठी धर्मारुपी सूर्याचा उदय करण्यासाठी बाळकृष्णाने हि लीला केली.मात्र
भगवंत जेथे चोरी करीत असत त्या वस्तू चोरी होऊनही दुप्पट झाल्याचे आढळत असे संत
नाथमहाराज सांगतात.तरीसुद्धा श्रीकृष्णाच्या दर्शनाच्या हेतूने,त्याचे मुखकमल
पहावयाच्या लालसेने गौळणी यशोदेकडे त्याची गाऱ्हाणी घेऊन येत असत.
पूर्वीच्या काळी दही,दुध,लोणी मडक्यात भरून टांगून ठेवत असत.एके दिवशी
भगवान बाळकृष्ण सवंगड्यांना म्हणतो ”तुम्हाला गोरसचं हवाय ना,चला या माझ्या मागे”.खोडकर
बाळकृष्ण काही त्यांना स्वत:च्या घरी नेऊन गोरस मुळीच देणार नसतो.कृष्णाने
आतापर्यंत एका गौळणीवर पाळत ठेवलेली असते ती गौळण जळणासाठी सरपणाच्या शोधात बाहेर
पडलेली पाहून हा मुरलीधर माधव तिच्या घरात घुसतो त्याच्यामागोमाग त्याचे सारे सवंगडी
येतात.गौळणीने दुधादह्याचे मडके चांगलेचं उंचावर ठेवलेलं असते.”अरे मुरारी शिंक्यावर
तर आपला हात पोचणार नाही,आता काय करावे?”असा प्रश्न सवंगडी कृष्णाला करतात.इथे
कृष्ण आपला पहिला मानवी मनोरा उभारतो.एका विधायक कामासाठी बाल-तरुणांची संघटन
शक्ती एकवटण्याचे काम करतो.मनोरा रचून झाल्यावर कृष्ण आपल्या बासरीने सर्वात
वरच्या थरावर ठेवलेले लोण्याचे मडके फोडतो.आनंदाने सगळे गोपाल नाचायला सुरुवात
करतात.”भली ले गोविंदा युक्ती केली” अस म्हणत पेंद्याही आनंदात नाचू लागतो.”कोणी
पिती दुध कोणी खाती दही”अशी एकच घाई सगळ्यांची होते.
गाई चरायला नेल्यावर कधी या दह्या-दुधात सगळ्यांच्या शिदोऱ्या
कुस्करून त्यांचा एकच काला करून भेदनिर्मुलानातून होणाऱ्या एकतेच,अभेदाच शिक्षण
भगवान देतात.हाच “आनंदाचा काला गोपाळकाला”.हा आनंद वैकुंठात देखील दुर्लभ नाही असं
तुकाराम महाराज म्हणतात.अरे गोपाळकृष्णा,हा दहीभात खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा
जन्म घेऊ असे सर्व संत एकमुखाने म्हणतात.या उत्सवात मोठ मार्दव
आहे,लाज-काज,संकोच-भीड-भीती यांचा पूर्ण नाश झाल्याशिवाय या काल्याचा आनंद अनुभवणे
शक्य नाही.उच्च-नीचतेचा भेद मोडून समाजातील प्रत्येक स्तराशी समरस जो होईल त्यालाच
काल्याचा आनंद मिळेल.”तुका म्हणे देवापाशी | विटाळशी नसावी” असं तुकाराम महाराज
म्हणतात ते याचसाठी.असा हा काला करून ज्यावेळी भगवान कृष्ण आपल्या हाताने प्रत्येक
गोपाळाच्या मुखात घास भरवू लागला त्यावेळचे दृश्य पाहून स्वर्गीचे देव मोहित
झाले.भगवंताच्या हातचा घास आल्यासुद्धा मुखात पडावा अशी तीव्र इच्छा त्यांना
निर्माण झाली.परंतु या गाई राखणाऱ्या गोपाळांच्या पंक्तीला बसण्यात त्यांना कमीपणा
वाटला.तेव्हा देवांनी एक युक्ती केली.काला संपल्यावर भगवान श्रीकृष्ण जेव्हा यमुना
नदीत हात धुवायला येतील तेव्हा त्यांच्या हाताला चिकटलेले अन्नकण आपल्याला खायला
मिळतील या अपेक्षेने त्यांनी मस्त्यरूप धारण केले.मात्र अखिलजगतव्यापक परमात्मा
श्रीकृष्ण भगवानापासून कुठली गोष्ट लपून राहणार ? श्रीकृष्णाने देवांचा अंतस्थ
हेतू ओळखला आणि हा पठ्या पितांबराला हात पुसून मोकळा झाला.भेदाची दृष्टी
ठेवणारे,उच्चपणाचा अहंकार बाळगणारे देव एकतेच्या सुखाला वंचित राहिले.तेव्हा या
पवित्रदिनी समाजाप्रती आपले असलेले उत्तरदायित्व ओळखून आपले ज्ञान,धन,शक्ती याचा
उपयोग समाजाच्या विधायक कल्याणासाठी कसा करता येईल याचा किमान विचार करण्याचा
संकल्प आपण करूया.प्रत्येक माणूस हा समान दर्जाचा आहे,एकतेतचं खरा आनंद आहे,भेदाचा
विचार दु:खमूलक आहे ही शिकवण आपण भगवान कृष्णाच्या गोकुळात केलेल्या चरित्रावरून
घ्यायला हवी.
No comments:
Post a Comment