विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ||१||
एकांती एकल्या एकाच सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्याला ||२||
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परि चोरी आंरभिली ||३||
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्याही येथे नका आम्हापाशी ||४||
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । त्या चोरोनि तिहीं खेट केली ||५||
भेऊनियां जना एकींसवा झाल्या । वाती विझविल्या दाटो बळे ||६||
कृष्णसुख नाहीं कळले मानसी । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ||७||
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणुऊनि समेळ मेळविला ||८||
अंतरीं कोमळा बाहेरि निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानी ||९||
हरिरुपी दृष्टी कानी त्याची गोष्टी । आळगिती कंठी एकाएकी ||१०||
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ||११||
विसरल्या मागे गृह सुत पति । अवस्था याचिती गोविंदाची ||१२||
अवस्था लागोनि निवळचि ठेल्या । एकाएकी झाल्या कृष्णरुपा ||१३||
कृष्ण म्हणुनवुनी देती आलिंगन । विरहताप तेणे निवारेना ||१४||
ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनी न देखता ||१५||
न देखता त्यांचे प्राण रिघो पाहे । आजि कामा सये ऊशिर केला ||१६||
रित्या ज्ञानगोष्टी तया नावडती । आलिंगन प्रिती कृष्णाचिया ||१७||
मागे आम्ही काहीं चुकलो त्याची सेवा । असेल या देवा राग आला ||१८||
आठविति मागे पापपुण्य दोष । परिहार एकिस एक देती ||१९||
अनुतापे झाल्या संतप्त त्या बाळा । टाकिती विव्हळा धरिणी अंग ||२०||
जाणोनि चरित्र जवळिच होता । आली त्या अनंता कृपा मग ||२१||
होउनि प्रगट दाखविले रुप । तापत्रयताप निवविले ||२२||
निवाल्या देखोनि कृष्णाचे श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ||२३||
साच भाव त्यांचा आणुनिया मना । आळंगिती राणा वैकुंठिचा ||२४||
हरिअंगसंगे हरिरुप झाल्या । बोलो विसरल्या तया सुखा ||२५||
व्याभिचारभावे भोगिले अनंता । वर्तोनि असता घराचारी ||२६||
सकळा चोरोनि हरि जया चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्ये ||२७||
उणे पुरे त्यांचे पडो नेदी कांही । राखे सर्वाठायी देव तया ||२८||
न कळे लाघव ब्रह्मादिकां माव । भक्तिभावे देव केला तैसा ||२९||
तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार । साधिले अपार निजसुख ||३०||
अभंग क्र-३७७० (शिरवळकर)
vichar kariti baisoni gaulani gavalani jya krushna krushnakamini kamatura
No comments:
Post a Comment