आवाहन

Tuesday, April 29, 2014

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय


वारकरी पंथाचे लोक विष्णूची विठ्ठल या रूपाने आराधना करतात. तेही भक्तिमार्गी आहेत. कर्नाटकच्या होयसाल राज्यकर्त्यांनी या पंथाची प्रथम महाराष्ट्राला ओळख करूने दिली. ज्ञानेश्वर व नामदेव या दोघा संतांनी त्याचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला. म्हणूनच म्हटले आहे- ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रमुख पंथ आहे. आजही हजारो वारकरी मोठ्या पालख्या घेऊन आषाढी-कार्तिकी एकादशांना दिंड्या काढून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी पायी जाताना आढळतात.
विठ्ठल हे दैवत नामदेव वा ज्ञानदेवाच्या जन्माच्या आधीपासून महाराष्ट्रात ठाऊक होते. पंढरपूरच्या देवालयातील शिलालेख त्याची स्थापना सहाव्या शतकात झाली असे दाखवितो. परंतु नामदेव व ज्ञानेश्वरांनी या पंथात एक चैतन्य निर्माण करून या पंथाचा महाराष्ट्रात सर्वत्र प्रसार केला. ज्ञानयोग, भक्तियोग व अद्वैताचा अवलंब करून त्यांनी या भक्तिमार्गाला एक नवा दृष्टिकोन दिला.
वारकरी पंथ जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाही. यज्ञायाग, चातुर्वर्ण्य, दलित वर्ग व स्त्रिया यांचे शोषण याविरूद्ध या पंथाच्या अनुयायी बंडखोरी पुकारली. दलित वर्गीय व स्त्रिया यांना विठ्ठलावर अभंग रचून ते गाण्याचे अधिकार प्राप्त झाले. सर्वांनी मिळून समूहाने अभंग, प्रार्थना, भजन करण्याचा प्रघात पडला. त्याचप्रमाणे कीर्तन हा प्रकार लोकप्रिय झाला. या समूह गायनामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष, बुद्धिवान वा निरक्षर असा भेद कधीच केला गेला नाही. या सर्व नव्या रूढीमुळे महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमुळे उजळून निघाला. देवभक्ती व मानवता या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम झाला आणि पर्यायाने महाराष्ट्रीय जनतेची एकजूटही वाढली.
या पंथाचा ध्वज वारकरी पंथातील सर्व जातीजमातीतील अनुयायांनी फडकत ठेवला. चोखामेळा (महार), सावता माळी (माळी), तुकाराम (वैश्य) व एकनाथ (ब्राह्मण) अशा सर्व थरातील शिश्यांनी या पंथाला समाजात विशेष स्थान प्राप्त करून दिले. या पंथात गुरू नाही की मठ नाही. वारकरी हा स्वतःच्या हिंमतीने स्वतःला वैकुंठाप्रत नेण्याची आकांक्षा बाळगतो.
ते करताना त्याचे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग या कोणत्याही मार्गाचा अवलंब करावा. असे करीत असता तो जे थोडबहुत नियम पाळतो ते असे- शाकाहार करणे, मद्यपान अथवा स्वैराचार वर्ज्य, एकादशीला उपवास करणे, चंदनाचा टिळा कपाळावर लावणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे व पंढरपूरची वारी करणे. या अत्यंत साध्या नियमांमुळे अतिशय दरिद्री अथवा निरक्षर माणूससुद्धा या पंथाच्या चौकटीत स्वतःचे स्थान मिळवू शकतो. या संप्रदायामुळे मराठी भाषेला काव्याप्रमाणेच तत्वज्ञानाचे लेणे लाभले.

                                                                                                                                        -मीना तालीम


हा लेख इथून घेतला आहे -http://www.marathimati.com/maharashtra/Dharma_Pantha_Meena_Talim.asp

No comments:

Post a Comment